येथील परिसरातून मोर्णा नदी वाहते. अकोला शहरातील मध्य भागातून वाहत येणाऱ्या मोर्णा नदीतील पाण्यावर नायगाव, टाकळी, जलम, वाकापूर, सुकोडा, कानडी, भोड, सांगवी, मोहाडी, उगवा, सांगवी बाजार, फरिमरदाबाद, नवथळ, खेकडी, सांगवी खु., आगर, पाळोदी, गोत्रा, खांबोरा, लोणाग्रा, हातला, दुधाळा, मंडाळा व बाळापूर तालुक्यातील मालवाडा व हातरूण येथील पशुपालक व शेतकरीवर्ग अवलंबून आहेत. सोबतच या सर्व गावांमधील अनेकांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. दूषित पाण्यामुळे मासोळींचा मृत्यू होत असल्याने, मासेमारीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मागील पंधरवड्यात नदीतील पाणी वाहणे बंद झाले होते. त्यामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह असलेल्यांना सुगीचे दिवस आले होते. परंतु मागील आठवड्यात अकोला शहरातील सांडपाणी वाहत असल्याने, नदीतील मासोळ्या गतप्राण होत आहेत. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत, ५ एप्रिल रोजी आगर गावातील मोर्णा नदी पात्राला भेट दिली व नदीतील दूषित पाण्याची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
प्रदूषण मंडळाच्या चमूने केली मोर्णा नदीतील पाण्याची पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:18 AM