पातूर: तालुक्यातील आलेगाव-जांब पाचरण रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामस्थांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत असून, पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आलेगावपासून जांब- पाचरण-सावरखेड पर्यंत दहा किलोमिटर रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी कामाला सुरुवातही करण्यात आली होती; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. एक वर्ष उलटूनही कामाला सुरुवात झाली नसल्याने रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. मध्यंतरी रस्त्यावर कामाच्या पाट्या लावून काम झालेल्या तीन पुलांची रंगरंगोटी करण्यात आली आणी पुन्हा काम बंद पडले. आज रोजी रस्त्याचे गिट्टीकरण आणि खडीकरण पूर्णपणे उखडले आहे. रस्त्यावर गिट्टीचे ढीग निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर केलेले मातीकाम पावसामुळे वाहून गेले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर अपघात घडून अनेकांना अपंगत्व आले आहे. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. जांब, पाचरण या दोन्ही डोंगराळ भागातील खेड्यांचे अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार हे आलेगावशी जोडलेले आहेत. ग्रामस्थांना हा एकच पर्यायी मार्ग असल्याने जीव मुठीत धरून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)