लोकमत न्यूज नेटवर्क
अंदुरा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बाळापूर तालुक्यातील अंदुरा-बोरगाव वैराळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली; मात्र काही दिवसातच या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जड वाहनांना प्रवेश नसतानाही या मार्गावरून दररोज रेती व मातीची अवैध वाहतूक करणारी अवजड वाहने धावतात. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अवजड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अंदुरा-बोरगाव वैराळे हा रस्ता करण्यात आला. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, काही दिवसातच अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही या मार्गावरून रेतीची व मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. रविवारी प्रवेशबंदी असताना एक ट्रक या मार्गाने जात असताना गावातील पाण्याचा व्हाॅल्व्ह असलेल्या ठिकाणावर फसला. यामध्ये व्हॉल्व्हचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातून रात्रं-दिवस मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरूच असते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------------------------------
प्रवेशबंदी असतानाही या मार्गावरून अवजड वाहने ये-जा करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत महसूल प्रशासनालाही कळविण्यात येईल.
- रुख्माताई गणेश बेंडे, सरपंच, अंदुरा.