लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणखेड : बांबर्डा - पुंडा व रोहणखेड - कुटासा या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रोहणखेड परिसरातील बांबर्डा - पुंडा व रोहणखेड - कुटासा या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रोहणखेड ते कुटासा हे अंतर पाच किलोमीटर असून, या संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.
बांबर्डा - पुंडा हा रस्ता ३ किलोमीटरचा असून, अकोट शहराला जोडतो. या रस्त्याने सावरगाव, कवठा, रोहणखेड, कुटासा, पुंडा या भागातील ग्रामस्थांची वर्दळ असते. हा रस्ता अनेक मार्गांना जोडत असल्याने वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ( फोटो)
बांबर्डानजीकचा पूल शिकस्त!
बांबर्डा - रोहणखेड मार्गावरील बांबर्डानजीकच्या नाल्यावरील पूल शिकस्त झाला असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या मार्गावरील वर्दळ नेहमी बंद राहात असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.