खेट्री : अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले तसेच अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या पातूर तालुक्यातील ६ किलोमीटर अंतर असलेल्या उमरा-सावरगाव मार्गावरील पुलाची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, अपघातात वाढ होत आहे. मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार केली, परंतु अद्याप दखल घेतली गेली नाही. या पुलाच्या दुरवस्थेमुळे परिसरातील जवळपास २५ ते ३० गावांतील वाहनधारक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील ग्रामस्थांना बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव, मेहकर, औरंगाबाद, पुणे येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन तातडीने पुलावरील मधोमध पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
--------------
गत दोन वर्षांपासून पुलाच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक वेळा अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत, तरी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.
विठ्ठल मुके, ग्रामस्थ उमरा
----------------
उमरा-सावरगाव मार्गवरील पुल जीर्ण झाला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
गोपाल राठोड, सावरगाव