संजय गवळी
पणज: अकोट तालुक्यातील पणज व वडाळी देशमुखच्या मध्यभागी कोट्यवधी रुपये खर्च करून शहापूर बृहूत प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल या उद्देशाने शासनाने प्रकल्प उभा केला; मात्र याला शहापूर बृहत् प्रकल्प अपवाद ठरला आहे. प्रकल्प उभारताना तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रकल्पातील बॅक वॉटरमुळे पणज, धामणगाव परिसरातील शेतरस्ते बंद पडतात. तसेच परिसरातील शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात नरकयातणा सहन कराव्या लागतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
शहापूर प्रकल्पातील बॅक वॉटरमुळे परिसरातील सात शेतरस्ते बंद पडतात. पावसाळ्यात शेतकऱ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. ज्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम केले ते पुलही पाण्याखाली येत असल्याने शेतात जावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. गतवर्षी पावसाळ्यात धामणगाव शेतरस्त्यावरील पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. नदीकाठावरील शेती खरडून गेली होती. वडाळी रस्त्यावरील शेतात पाझरामुळे जवळपास ३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत सर्व्हे करण्यात आला होता; मात्र अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
-----------------------------
गतवर्षी पणज, धामणगाव परिसरातील शेतरस्ते पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे बंद पडले होते. त्यामुळे शेतकरी व शेतीचा संपर्क तुटला होता. सध्या पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे, तरी शेतरस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यापूर्वी शेतरस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्थथा शेतकरी आंदोलन करणार.
-मधुकर कोल्हे सरपंच पणज
------------------------
पहिल्याच पावसात शेतात जाण्यासाठी करावी लागली कसरत
शहापूर बृहत प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे तसेच पहिल्याच पावसात शेतरस्ते पाण्याखाली येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.