तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव, फवारणीला वेग
अकोला : जिल्ह्यातील विविध भागांत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकाच्या संरक्षणासाठी शेतकरी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करताना दिसून येत आहे. वातावरणातील बदल हे अळ्यांसाठी पोषक ठरत असल्याने अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषीतज्ज्ञांनी केले आहे.
भौरद, बाखराबाद मार्गाचे डांबरीकरण करा
अकोला : शहरापासून जवळच असलेल्या भौरद बाखराबाद रस्त्याचे खडीकरणाचे काम झाले असून, या मार्गाला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. रस्त्यावरील खडकांमुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळेदेखील नागरिकांना त्रास होत असून, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
क्षयरोग तपासणी मोहिमेस सहकार्य करा
अकोला : जिल्ह्यात १ डिसेंबरपासून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात सुरुवात झाली आहे. मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेत आहेत. नागरिकांनी आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून त्यांना योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जीएमसीत कोविड अहवालाची स्वतंत्र व्यवस्था
अकोला : कोरोना चाचणीनंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अहवाल मिळणे सोयीचे जावे, या आनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयातील श्रोतृगृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून ही सुविधा करण्यात आली असली, तरी रुग्ण व त्यांचे नातेवाईक अहवालासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमाेर गर्दी करताना दिसून येतात.