लाखपुरी : मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमधील लाखपुरी ते दातवी ते मंगरुळ कांबेसह लाखपुरी सर्कलमधील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दातवी रस्ता जीवघेणा झाल्यामुळे संपूर्ण वाहनधारक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकजण जखमी झाले आहेत. या रोडवर अपघाताच्या घटना वाढत असूनही बांधकाम विभाग दखल घेत नाही.
या रस्त्यासंदर्भात अनेक निवदने देऊनसुध्दा बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. ५ वर्षातून एखाद्या वेळेस थातूरमातूर खड्डे बुजवितात. या रस्त्यांची जबाबदारी तरी कुणाची, असा प्रश्न लाखपुरी सर्कलमधील सामान्य नागरिकांना पडला आहे. रस्त्याचे काम होत नाही. एका वर्षात रोड उखडतात. रस्त्यांच्या विकासाकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरातील रस्त्यांना कुठे खडीकरण तर कुठे डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. यामध्ये लाखपुरी सर्कल लाखपुरी ते दातवी, मंगरुळकांबे, जांभा , लाईत, रेपाटखेड, पायटांगी, दुर्गवाडा, सांगवी, वाघझडी रस्त्यांचा समावेश आहे. ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या रस्त्यांसह विविध समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी तथा शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेतील रस्ते बांधकाम हा प्रमुख घटक असून यासाठी शासनाकडूनही निधी पुरवला जातो. परंतु बांधकाम विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने रस्त्यांचे कामकाज निकृष्ट होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष न करता प्रश्न निकाली काढावा व व संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे. रस्त्याचे काम त्वरित चालू करावे. अन्यथा लाखपुरी सर्कलमधील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लाखपुरीच्या माजी. पं.स सदस्या मिनल नवघरे, सहसचिव रोशन वानखडे, रवी वानखडे, संघपाल नितोने , अतुल नवघरे, जगदीश पळसपगार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फोटो:
लाखपुरी-दातवी रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. संपूर्ण रस्ता खोदून नवीन बांधकाम करण्यात येईल. रस्त्याच्या बांधकामाबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरूवात सुरूवात होईल.
- वानखडे, उपविभागीय अभियंता सा.बां. विभाग मुर्तिजापूर )
लाखपुरी सर्कलमधील लाखपुरी ते दातवी, मंगरुळकांबे, जांभा व सर्कलमधील इतर गावात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाने रस्त्याचे काम करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल.
-रोशन वानखडे, तालुका सहसचिव, वंचित बहुजन आघाडी