मूर्तिजापूर तालुक्यात शहर आणि ग्रामीण अशा दोन ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, ही निवासस्थाने मोडकळीत आली आहेत. पोलिसांच्या जीवालासुद्धा धोका निर्माण झाला आहे. मूर्तीजापूर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलिसांच्या निवासस्थानांचे सर्वेक्षण झाले असून, या पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन घरांची प्रतीक्षा लागली आहे. ४०-५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली निवासस्थाने आज जीर्ण झाली आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी अशा घरांमध्ये राहण्यास नकार देत आहेत. त्यांना मुख्यालयी राहता येत नाही. त्यामुळे दररोज अप-डाऊन करून कर्तव्यावर हजर व्हावे लागते. पोलिसांना हायवे क्रमांक सहावरून अकोला-अमरावती जिल्ह्यातील कर्तव्य बजावण्यासाठी यावे लागत आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना राहण्यासाठी नवीन निवासस्थाने बांधून देणे गरजेचे आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष देऊन पोलिसांची समस्या निकाली काढावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहीम घाणीवाला यांनी केली आहे.
फोटो: ईएमएसमध्ये
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पुढाकाराने मूर्तिजापूर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसह निवासस्थानांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. एकही घर व इमारत राहण्यायोग्य नाही. पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षकांना यासंदर्भात पत्र देण्यात आले.
-सचिन यादव, ठाणेदार शहर पोलीस स्टेशन मूर्तिजापूर
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १०० नवीन निवासस्थानांची गरज
मूर्तिजापूर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन मिळून अशी एकूण ५० निवासस्थाने आहेत. परंतु, यापैकी एकही घर राहण्यायोग्य नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिसांना राहण्यासाठी नवीन शंभर घरांची गरज आहे. याकरिता आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इब्राहीम घाणीवाला यांनी सांगितले.