प्रशांत विखे
तेल्हारा: तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या कामाकरिता दोन महिन्यांपूर्वी विशाल नांदोकार या युवकाने बेमुदत उपोषण केले होते. पाच दिवसांनंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यास तीन दिवसांत काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दोन महिने उलटूनही अद्याप रस्त्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शुक्रवार, दि.३ सप्टेंबर रोजी रस्ता देखरेख समितीने तहसीलदारांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रस्ता देखरेख समितीने निवेदनातून दिला आहे.
रखडलेल्या विकासकामांमुळे शहराला जोडणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात १२ जणांना जीव गमवावा लागला असून, अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या पिवळ्या मातीमुळे पावसाळ्यात वाहन घसरून अपघात घडत आहेत, तर वाहनचालकास वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना आजार जडत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांची वाहने तसेच एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा खिळखिळ्या झाल्या आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करीत रस्ता देखरेख समितीने निवेदन दिले आहे. निवेदनावर रस्ता देखरेख समितीचे विशाल नांदोकार, सचिन थाटे, डॉ. शहेजाद खान, आनंद राठी, दादा टोहरे, उज्वल दबडघाव, प्रवीण पोहरकार, गजानन गायकवाड, रामभाऊ फाटकर, स्वप्नील फोकमारे, धीरज बजाज, आशिष जयस्वाल यांच्या सह्या आहेत.
---------
पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले
रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू व्हावी, अशी मागणी करीत अनेकांनी आंदोलने केली. विशाल नांदोकार या युवकाने काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण केले होते. हे उपोषण सोडविण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी जाऊन रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, असे आश्वासन दिले होते. या संदर्भात संबंधित कंत्राटदारांना तसे आदेश सुद्धा दिले होते, परंतु, आश्वासन दिल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी कुठल्याही प्रकारचे ठोस काम केलेले दिसून येत नाही. त्यामुळे आजही रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
--------------
आठ दिवसात रस्त्यांचे काम सुरू करा
रस्ता देखरेख समितीने तहसीलदारांना निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत रस्त्यांचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. काम सुरू न झाल्यास रस्ता देखरेख समितीच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार, असाही निवेदनातून इशारा दिला आहे.
-------------