मूर्तिजापूर : तालुक्यातील उमई - शेलुबोंडे रस्त्याची चाळणी झाली असून, यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
उमई-शेलुबोंडे या गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. संपूर्ण रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे रोडवर आल्याने येथील नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. दुचाकी व चारचाकी वाहनामुळे रस्त्यावर आलेली गिट्टी नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. उमई ते शेलुबोंडे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी मूर्तिजापूरला ये-जा करतात. वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे, शहर अध्यक्ष शरद हजबे, उपाध्यक्ष हरिभाऊ वानखडे, पत्रकार विलास नसले, समाजसेवक मुन्ना नाईकनवरे, विवेक शिंदे, दीपक बनारसे, शाम येवले, जय मोहिते, निवृत्ती कान्हेरकर आदी उपस्थित होते.