वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ते चिंचोली (गणू) या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित प्रशासनाचा दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थांना पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये वाट काढावी लागत आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील प्रसिद्ध व मोठी बाजारपेठ म्हणून वाडेगावची ओळख आहे. अनेक ग्रामस्थ याच मार्गे ये-जा करतात. या रस्त्यावरून पिंपळगाव, तांदळी, धाडी, बल्हाडी, लोणी कदमापूर, चिंचोली गणू या सर्व गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थी आदी कामानिमित्त प्रवास करतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने चिंचोली गणू ते वाडेगाव रस्त्याचे गंभीर चित्र समोर आणले. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. ग्रामस्थांना या खराब पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. वाडेगाव येथून ४ ते ५ किमी असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर रस्त्याच्या दुरवस्थामुळे वाहनचालकांवर गंभीर प्रसंगही ओढावले आहे.
वारंवार मागणी, तरी दुर्लक्ष
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबधित विभागासह लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करण्यात आली, तरीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विनंती व निवेदन सादर करण्यात आले होते.
सरपंच म्हणतात...
या रस्त्यावरील पिंपळगाव, तांदळी, धाडी, बल्हाडी व चिंचोली गणू येथील ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरवस्थामुळे नाहकत्रास सहन करावा लागत आहे.
- प्रल्हाद गोतमारे, सरपंच, चिंचोली गणू
ग्रामस्थ म्हणतात...
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासन विभागासह लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी व निवेदन सादर करण्यात आले, तरीही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
- अमोल सरदार, ग्रामस्थ, चिंचोली गणू
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, परंतु या रस्त्याच्या कामात दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्यात येईल.
- सतीश अंभोरे, ग्रामस्थ, चिंचोली गणू
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींकडे निवेदन सादर करण्यात आले. मात्र, याकडे लक्ष दिले गेले नाही. म्हणून रस्त्यावर आता डबके साचत आहेत.
- ए.डी. अंभोरे, ग्रामस्थ, चिंचोली गणू