विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
तेल्हारा : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे न. प. व पोलीस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी चिंतित !
वाडेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. त्यामुळे वाडेगाव परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही शेतकरी गावोगावी फिरून टरबुजाची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
अकोट-पूर्णा रेल्वे सुरू करण्याची मागणी
अकोट: अकोट-अकोला लोहमार्ग गेज परिवर्तनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे अकोट-अकोला-पूर्णा व काचीगुडा-अकोट रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अकोट येथील विधी सेवा समिती व मानव समाज संस्थेचे सचिव विजय जितकर यांनी केली आहे.
दिव्यांगांना साहाय्यता निधीचे वितरण
मूर्तिजापूर : नगर परिषदेच्या दिव्यांग साहाय्यता निधीअंतर्गत पाच टक्के निधीची २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षाकरिता आठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नगरपालिका क्षेत्रातील २७४ पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात ६ लाख १५ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
पांढुर्णा येथील दलित वस्तीमधील हातपंप बंद
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा येथील दलितवस्तीमधील हातपंप अनेक दिवसांपासून बंद असल्याने, दलित वस्तीमधील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दलितवस्तीमधील हातपंप बंद असल्याने महिलांना पाण्याअभावी भटकंती फिरावे लागत आहे.
गांधीग्राम कनिष्ठ अभियंत्याचे दुर्लक्ष
वल्लभनगर : निंभोरा येथील इलेक्ट्रिक लाइटकरिता गावांमध्ये ३० लोखंडी पोल उभारले आहेत. यापैकी अनेक पोल गंजले आहेत. त्यामुळे हे पोल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. याकडे महावितरणच्या उपअभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी पोल व गार्डनची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नियमित कर्ज भरणारे शेतकरी रकमेपासून वंचित
हाता : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली हाेती. परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजारांची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंजर-बार्शीटाकळी मार्गावर गतिरोधक बसवा
पिंजर : पिंजर-बार्शीटाकळी रस्त्याचे नवीन बांधकाम नुकतेच करण्यात आले असून, आमराईच्या टी पॉईंटवरून एक रस्ता मंगरूळपीरकडे जातो, तर दुसरा अकोल्याकडे जातो आणि तिसरा पिंजरकडे येतो. पिंजर- बार्शीटाकळी मार्गावरील आमराईमधील महान-पिंजर टी पाॅईंटवर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
सस्ती परिसरात मातीचे अवैध उत्खनन
दिग्रस बु : पातूर तहसीलअंतर्गत येत असलेल्या सस्ती परिसरात मातीचे अवैध उत्खनन सुरू असून, याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. दररोज शेकडो ब्रास उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याने लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागत असल्याचे चित्र आहे.
सांगोळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
खेट्री : सांगोळा-पिंपळखुटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगोळा-पिंपळखुटा रस्त्याचे काम सुरू आहे. या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात असल्याचा आरोप होत आहे.