विझोरा : येवता-विझोरा-कानशिवणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दादाराव पवार यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
परिसरातील विझोरा-येवता-कानशिवणी व विझोरा-गोरव्हा या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विझोरा, मार्गे येवता-कानशिवणी हे अंतर १२ किलोमीटर असून या संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.
विझोरा-कातखेड व गोरव्हा, विझोरा दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची ओव्हरलोड वाहतूक होत आहे. यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. परिसरातील येवता, विझोरा, कातखेड, गोरव्हा, आदी भागांतील ग्रामस्थांची या रस्त्याने वर्दळ असते. रस्ता अनेक मार्गांनी जोडत असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. विझोरा-गोरव्हा अंतर तीन ते चार किलोमीटर असून, बार्शीटाकळी तालुक्याच्या ठिकाणी मार्ग जोडतो. या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दादाराव पवार यांनी मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनातून केली आहे. (फोटो)
आंदोलनाचा इशारा
येवता-विझोरा, विझोरा-गोरव्हा रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे सदस्य दादाराव पवार यांनी निवेदनातून दिला आहे.