लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निर्धन व दुर्बल घटकातील किती रुग्णांना लाभ देण्यात आला, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि धर्मादाय रुग्णालय समितीकडे नियमितपणे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा धर्मादाय रुग्णालय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आमदार हरीश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) गजानन सुरंजे यांच्यासह धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, धर्मादाय रुग्णालय समितीचे सदस्य व धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील नऊ धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्णांसाठी १० टक्के आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार रुग्णालयांकडून दर महिन्याला निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना किती लाभ देण्यात आला, याबाबतची माहिती धर्मादाय रुग्णालयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह धर्मादाय रुग्णालय समितीकडे नियमित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, तसेच अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटलसह जिल्ह्यातील इतर धर्मादाय रुग्णालयांमधील उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ९० टक्के रुग्णांकडून जमा करण्यात येत असलेल्या दोन टक्के सेवा शुल्काचा विनियोग १० टक्के व दुर्बल घटकातील रुग्णांवर कशा प्रकारे खर्च करण्यात येतो, याबाबतचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
निर्धन, रुग्णांना दिलेल्या लाभाची माहिती द्या!
By admin | Published: June 30, 2017 1:02 AM