आशिष गावंडे / अकोला: गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य शासनाकडून तीन वर्षांंपूर्वी रमाई आवास घरकुल योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत महापालिकेला १२४0 घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट मिळाले. आजच्या घडीला केवळ १३२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित ६७५ घरकुलांचे काम संथगतीने सुरू असल्याने गरिबांचे स्वप्न कधी पूर्ण होईल,असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका क्षेत्रातील दारिद्रय़रेषेखालील नवबौद्धांना रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत हक्काची घरे मंजूर करण्यात आली. २0१३ मध्ये मंजूर योजनेंतर्गत १२४0 घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट मिळाले. यासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मनपाला अतिरिक्त निधी मिळाल्याने शासन निर्देशानुसार आकोट नगरपालिकेकडे ७ कोटींचा निधी हस्तांतरित करण्यात आला होता. एका घरकुलासाठी २ लाख रुपयांची तरतूद असल्याने उर्वरित २५ कोटींतून घरकुल उभारणीचे काम शक्य आहे. गत तीन वर्षांंपासून घरकुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळेच आजपर्यंंत केवळ १३२ घरकुलांचे काम पूर्ण झाल्याची वस्तुस्थिती आहे. मनपा प्रशासनाला लाभार्थींंचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विशेष समाजकल्याण विभागाची मंजुरी आवश्यक ठरते. त्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाच्या कामाला सुरुवात होऊन लाभार्थींंच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाते. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी या विषयाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे घरकुलांचे काम रखडल्याचे चित्र आहे. आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी घरकुलाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बांधकाम विभागाला वेळावेळी सूचना, निर्देश दिल्यानंतर ६७५ घरकुलांचे प्रस्ताव निकाली काढले. तसेच ३५५ घरकुलांच्या फाइल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे मार्च महिन्यापर्यंत निकाली न निघाल्यास मनपाला प्राप्त निधी शासनाकडे परत जाण्याचे संकेत आहेत.
गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अधुरेच!
By admin | Published: February 06, 2016 2:23 AM