- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले असून, गोरगरीब मजुरांच्या हाताला काम नाही आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका नसल्याने धान्य मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शिधापत्रिका नसलेल्या जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचे कवच देण्याची मागणी होत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजना अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासह एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक लाभार्थीला दरमहा ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे; परंतु अकोला शहरासह जिल्ह्यात अनेक गरीब, मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. जवळ पैसा नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यासंदर्भात उपाययोजनेची गरज असल्याची मागणी होत आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक गरीब कुटुंबांकडे पत्रिका नाहीत. लॉकडाउनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरित करण्याची गरज आहे .- शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष,
रास्त भाव दुकानदार संघटना
जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना धान्य वितरित करण्यासाठी पाययोजना प्रस्तावित आहे.- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी