लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ज्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली, तिने नकार दिला म्हणून तिच्याशी वाद घालीत तिच्याच नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे मित्र व मैत्रिणींना अश्लील मॅसेजेस करणाऱ्या युनियन बँकेच्या व्यवस्थापकास सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातून अटक केली. नीलेश अबगड असे आरोपीचे नाव आहे.मूळचा शिवणी येथील रहिवासी नीलेश प्रमोद अबगड (२६) हा उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात युनियन बँकेचा व्यवस्थापक आहे. त्याने काही दिवसांपूर्वी अकोल्यातील एका युवतीला फेसबुकवरून मॅसेजेस केले. त्यानंतर काही दिवसांनी तिला लग्नाची मागणी घातली. काही दिवस यावर दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर युवतीने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. वाद वाढल्याने नीलेश अबगड याने तिच्याच नावाचे बनावट फेसबुक अकाउंट कार्यान्वित केले. त्यानंतर या मैत्रिणीच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ओळखीचीच मैत्रीण असल्याने तिच्या मित्र आणि मैत्रिणींनी ती स्वीकारली; मात्र त्यावर नीलेश अबगड याने अश्लील वार्तालाप आणि मॅसेजेस टाकणे सुरू केले, त्यामुळे तिच्या मित्र आणि मैत्रिणींना संशय आला. या संशयामुळे सदर मैत्रिणीने आपले हे अकाउंटच नसल्याचे स्पष्ट करीत या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावीत उत्तर प्रदेशातून नीलेश अबगड याला अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात सायबर सेल व सिव्हिल लाइन पोलिसांनी केली.युवतीवर संशयनीलेश अबगड याला संबंधित युवतीवर दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने तिच्याच नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र हे करीत असताना त्याने ज्या युवतीच्या नावे फेसबुक अकाउंट कार्यान्वित केले, तिलाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. एवढेच नव्हे, तर तिलाही दुसऱ्याशी प्रेम आहे का, यासह अश्लील मॅसेजेस पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बनावट फ ेसबुक अकाउंटद्वारे अश्लील मॅसेज
By admin | Published: July 13, 2017 12:55 AM