अकोला : कोरोना महामारीच्या प्रकोपाने भेडसावलेला अकोला जिल्हा आता अत्यंत सावधानतेने कोरोनामुक्तीकडे पाऊल टाकत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असताना जिल्ह्यातील ८४४ पैकी ७४७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ‘गाव करी ते राव न करी’, या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी एकजुटीने कोरोना विरुद्ध आपपाल्या गावात मुकाबला केला आहे. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे आजचे ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचा मोकळा श्वास घेतला जातोय.
याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ५३५ ग्रामपंचायतीतील ८४४ गावांपैकी ७९३ गावे कोरोना विषाणूने बाधीत होते. तर ५१गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावच दिसून आला नाही. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून सद्यास्थितीत ७४७ गावे कोरोना मुक्त झाली आहेत. या गावांमध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसून सर्व रुग्ण बरे होऊन गाव कोरोना मुक्त झाले आहे. सद्यस्थितीत ४६ गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून या गावांमध्ये ११२ कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १७८ उपप्राथमिक आरोग्य केंद्र, पाच ग्रामीण रुग्णालय व मुर्तिजापूर येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार केला जातो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.