लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ने पुन्हा डोके वर काढले असून, शहरात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. गत काही दिवसांपासून ‘स्क्रब टायफस’सदृश तापाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी झुडुपांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, या दिवसांत कीटकांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत असून, हे कीटक प्रामुख्याने झुडुपांमध्ये आढळतात. यामधील ‘चिगर माइट्स’ हा कीटक घातक असून, त्यापासून स्क्रब टायफसचा धोका संभावतो. गत आठवड्यात जिल्ह्यात स्क्रब टायफससदृश तापाचे रुग्ण आढळून आले होते; परंतु त्यात एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कीटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच लक्षणे दिसताच नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनदेखील आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यात स्क्रब टायफसचे पाच संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. घाबरण्यासारखे कारण नसले तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.- डॉ. विवेक पेंढारकर,जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला.
‘स्क्रब टायफस’चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:27 PM