अकोला : कान्हेरी सरप रोडवरील चांगेफळ फाट्यानजीक शहराला पाणीपुरवठा करणारी महापालिकेची मुख्य जलवाहिनी शुक्रवारी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने शहराचा पाणीपुरवठा मंगळवारपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे.महान धरण ते अकोला शहरापर्यंंंत ९00 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. शुक्रवारी शहरातील जलकुंभात पाणी पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू असताना पाण्याचा प्रवाह आणि दाब कमी झाल्याची बाब महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास आली. या बाबीची शहानिशा करण्यात आली असता सायंकाळी ५ च्या सुमारास कान्हेरी सरप रस्त्यावरील चांगेफळ फाट्यानजीक मुख्य जलवाहिनी फुटल्याचे समोर आले होते. ९00 मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचा दाब प्रचंड मोठा असल्याने नजीकच्या शेतामध्ये पाणी शिरले होते. या घटनेनंतर मनपाच्या जलप्रदाय विभागामार्फत जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामकाजाची मनपा सभागृह नेता योगेश गोतमारे यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी उपअभियंता एस.पी. काळे, कनिष्ठ अभियंता एस.टी. चिमणकर व जलप्रदाय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असून, मंगळवारपर्यंंंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता जलप्रदाय विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली.
शहराचा पाणीपुरवठा उद्यापर्यंंत सुरळीत होण्याची शक्यता
By admin | Published: December 07, 2015 2:33 AM