लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. खारपाणपट्टय़ातील ५५ गावांना ६४ खेडी पाणीपुरवठा केला जातो; मात्र ही योजना आता बंद पडली आहे. त्यामुळे या गावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेने या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रातून पुरवठा करण्याचा विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर केला; मात्र नदीपात्रातून पाणी सोडताना नासाडी प्रचंड होणार आहे, त्यामुळे त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. त्याचवेळी या गावांना पाणीपुरवठा कोठून करावा, ही समस्या कायम आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी कुठेही हायड्रंट्सची सोय नाही. या समस्येवर पावसाळ्याच्या काळात उपाय करण्यासाठी सद्यस्थितीत दगडपारवा धरणातून पाणी घेण्याची तयारी आहे. धरणातील पाण्यावर महिनाभर योजना चालण्याची शक्यता आहे. त्यातही पुरवठय़ाचे नियोजन करावे लागेल. त्याशिवाय, सुकळी तलावात हायड्रंट्सची निर्मिती केली जाईल. त्यातून योजनेतील गावांना पुरवठा होईल. आणखी आठ दिवस पाऊस लांबल्यास ती उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक उपस्थित होते.
स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता जिल्हय़ातील दोन मोठय़ा योजनांशिवाय तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचीही स्थिती गंभीर होणार आहे. त्यामध्ये वझेगाव, लोहारा, कारंजा रमजानपूर योजनांचा समावेश आहे, तर ५३५ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांपैकी ५0 टक्के स्रोत आटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्याचा फटका जिल्हय़ातील चार लाखांपेक्षाही अधिक लोकसंख्येला बसणार आहे.
योजना बंद पडल्याने टंचाईग्रस्त गावेअकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुलतान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द ही गावे टंचाईग्रस्त आहेत.