हर्षनंदन वाघ/ बुलडाणा
टपाल खात्यांतर्गत कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस) प्रणाली सुरू झाली आहे; मात्र या प्रणालीचा पुढील टप्पा नेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू करण्यासाठी अळथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. नेटबँकिंगच्या वाढत्या स्पर्धेमुळे टपाल खाते मागे पडले असून, राज्यात २८ ठिकाणी उभारलेल्या एटीएम रूम अद्यापही मशिन्सच्या प्रतिक्षेतच आहेत. कुरिअर सर्व्हिस आणि काही खासगी सेवांनी टपाल कार्यालयासमोर निर्माण केलेल्या स्पर्धेच्या पृष्ठभूमीवर आयटी प्रोजेक्ट २0१२ अंतर्गत टपाल सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागाने कोअर बँकिंग सोल्युशन सुविधा देण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने राज्यातील पहिले ऑनलाइन पोस्ट ऑफिस बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे कार्यान्वित झाले. दुसर्या टप्प्यात राज्यातील विविध डाक कार्यालयांमध्ये ही सुविधा देण्यात आली. या सुविधेमुळे आवर्ती ठेव, मुदत ठेव, मंथली इनकम स्कीम, पब्लिक प्रॉव्हीडंट फंड, सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीमसह पोस्टाच्या सर्व सुविधा ऑनलाईन मिळणार आहेत. मात्र एटीएमची सेवा देताना या खात्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. टपाल खात्याने राज्यात जवळपास २८ ठिकाणी एटीएम रूम्स उभारल्या. त्यात मुंबईतील ५ डाक कार्यालयांचाही समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र एटीएम सेवा सुरू करण्यात टपाल खात्याला अद्याप यश मिळाले नाही.
*डाक विभागाचा वेग कमी
राज्यात २८ ठिकाणी एटीएम मशिन उभारणीसाठी एटीएम रूमचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र पोस्टातील ग्राहकांचे एटीएम खाते काढणे, एटीएम कार्ड देण्यासाठी त्यांचा फार्म भरणे, त्यांचे व्यवहार ऑनलाईन करणे आदी सोपस्कार पार पाडण्यासाठी वेळ लागणार आहे. बँकांची कामकाजाची पद्धती पाहिली की, त्या तुलनेत डाक विभागाचा वेग मंदावला असल्याचे जाणवत असून, त्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले आहेत.