अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६१ महाविद्यालये आहेत. यापैकी ३७ महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रभारीच काम पाहत असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. संस्था चालकसुद्धा प्राचार्यांची पदे भरण्यास चालढकल करीत आहेत.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत अकोला जिल्ह्यात ६१ वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ २४ महाविद्यालयांमध्येच प्राचार्य आहेत. उर्वरित ३७ महाविद्यालये मात्र प्राचार्यांविना काम करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. या संस्थांतर्गत त्यांनी कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये उघडली आणि आपले वलय निर्माण केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने वरिष्ठ महाविद्यालयांना मान्यता प्रदान करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले; परंतु या महाविद्यालयांकडून जे उद्दिष्ट अपेक्षित आहे, ते पूर्ण होत नाही. प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. प्राचार्यांविना अनेक महाविद्यालयांमध्ये कामकाज सुरू आहे. विद्यापीठांतर्गत ३७ महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा कारभार प्रभारी हाकत आहेत. अशा महाविद्यालयांची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे. कायमस्वरूपी प्राचार्य नसल्याचा सर्वाधिक फटका संबंधित महाविद्यालयांच्या अनुदानाला बसत आहे. दुसरीकडे प्रभारी प्राचार्यांचा महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत नसल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राचार्य नाही, तेथे नियमबाह्य शैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. महाविद्यालयांच्या प्लेसमेंटचे प्रस्ताव रखडले आहेत.संस्था चालकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षशिक्षण संस्था चालकांनी मोठा गाजावाजा करून महाविद्यालये स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन आपली झोळी भरण्याचे काम शिक्षण संस्था करीत आहेत. त्या तुलनेत विद्यार्थ्यांना प्राध्यापक, प्राचार्य उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची अवस्था तर यापेक्षाही वाईट आहे.