अकोला, दि. २0- महापालिकेची एकहाती सत्ता मिळविणार्या भारतीय जनता पार्टीने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीनंतर आता स्थायी समितीच्या गठनाकडे लक्ष कें द्रित केले आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन करून सभापतिपदासाठी सक्षम व्यक्तीची निवड करण्यासाठी पक्षात काथ्याकूट सुरू असल्याची माहिती आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी पहिल्यांदाच भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. २0 प्रभागांतील ८0 जागांपैकी तब्बल ४८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. साहजिकच, मनपात सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या बळावर भाजपने सत्ता स्थापन केली असली तरी भविष्यातही दज्रेदार विकास कामे कायम ठेवण्याची जबाबदारी पक्षावर आली आहे. निश्चितच महापालिकेतील पदाधिकारी-कंत्राटदार व अधिकार्यांची अभद्र युती पुन्हा होणार नाही, याचे भान पक्षाने ठेवणे अपेक्षित आहे. शहराचा व महापालिकेचा अभ्यास असणार्या विजय अग्रवाल यांची महापौरपदी तर वैशाली विलास शेळके यांची उपमहापौरपदी नियुक्ती केल्यानंतर आता पक्षाने स्थायी समितीच्या १६ सदस्यीय समितीच्या गठनाकडे लक्ष कें द्रित केले आहे. येत्या आठवड्यात स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया पार पडण्याची चिन्हे आहेत. त्या पृष्ठभूमीवर स्थायी समितीच्या सभापतिपदाची सूत्रे योग्य, सक्षम व पक्षाप्रती प्रामाणिक राहणार्या व्यक्तींच्या हातामध्ये सोपविल्या जाणार असे मानल्या जात आहे. त्यातही अनुभवी नगरसेवकांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मतांचे राजकारण भोवणार!महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागांमध्ये पॅनेलद्वारे निवडणूक लढणार्या पक्षाच्या उमेदवारांनी पॅनेलमधील इतर उमेदवारांना सहकार्य न केल्याची बाब काही ठरावीक प्रभागांत घडली होती. सहकारी उमेदवारापेक्षा दुसर्या पक्षाकडून निवडणूक लढणार्या मात्र एकाच समाजाशी जुळलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पारड्यात मते टाकण्यात आली. हा प्रकार मतमोजणीच्या दिवशीच उघडकीस आला होता. असे असतानाही महापौरपदी वर्णी लावण्यासाठी काही नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तगादा लावला होता. महापौरपदाच्या निवडणुकीत भोवलेले मतांचे राजकारण सभापतिपदाच्यादेखील आड येणार, हे निश्चित मानल्या जात आहे.
स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपमध्ये काथ्याकूट
By admin | Published: March 21, 2017 2:47 AM