अकोला: वैधमापन शास्त्राचे (वजने मापे) अमरावती विभागीय आयुक्त पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असून, सहायक नियंत्रकांकडे हे पद चक्रीसारखे फिरविले जात आहे. कमी मनुष्यबळात अतिरिक्त पदांच्या कामाचे ओझे वाढत असल्याने अधिकारी त्रासले आहे. कार्यालयीन पदोन्नतीची यादी मंत्रालयात अडकल्याने हे पद रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.दिवसेंदिवस व्यापार आणि बाजारपेठा वाढत असल्यामुळे राज्यातील वैधमापन शास्त्र कार्यालयाच्या कामकाजाचा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. हा पसारा कमी करण्यासाठी राज्य शासनाने या विभागाची नोंदीच्या प्रक्रिया आॅनलाइन केल्या आहे. अनेक वर्षांपासून या कार्यालयामध्ये नोकर भरण्याची प्रक्रिया थांबविलेली आहे. त्यामुळे अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्याचे कामकाज पाहण्याची जबाबदारी आयुक्तांकडे असते; मात्र चार वर्षांपासून या पदावर पूर्णवेळ कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त झालेले नाही. त्यामुळे चार वर्षांपासून आयुक्तपदाचा कार्यभार प्रभारावरच फिरतो आहे. वैद्यमापन शास्त्र कार्यालय अकोल्याचे सहायक नियंत्रक सतीश अभंगे यांच्याकडे मागील जून महिन्यापासून अमरावतीच्या आयुक्त पदाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांना अकोलासह पाचही जिल्ह्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. सहायक निरीक्षक अधिकाऱ्यांना, आयुक्तपदी पदोन्नती देण्यासाठीची यादी मंत्रालयात अडकून आहे. त्यात अमरावती विभागातील दोन अधिकारीदेखील आहे. त्यामुळे प्रभाराची ही चक्री सारखी फिरत आहे.