राम देशपांडे /अकोला : मोबाइल मॅसेजिंग, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टपाल खात्यातील प्रचलित पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय पत्राला उतरती कळा लागली आहे. पूर्वीप्रमाणे फारशी क्रेझ राहिली नसली तरी, टपाल खात्याला वर्षाकाठी प्रत्येक पोस्टकार्ड व अंतर्देशीय पत्रांच्या छपाईमागे अनुक्रमे ७.0३ व ४.९३ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. हा छपाई खर्च त्यांच्या विक्री किमतीपेक्षा अधिक असल्याने टपाल खात्याला दरवर्षी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. संगणक युगात पाऊल टाकण्यापूर्वी भारतात संदेश वहनाकरिता टपाल खात्याचे पोस्टकार्ड व अंतर्देशीय पत्र प्रचलित होते; मात्र संगणक युगात ई-मेल, मोबाइल मॅसेजिंग आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डाक विभागाची ही सशक्त माध्यमे काळाच्या ओघात मागे पडू लागली आहेत. टेक-सॅव्ही जगतात क्षणार्धात संदेशवहन करणार्या माध्यमांची मागणी वाढल्याने, कधीकाळी संपूर्ण देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय पत्रांची मागणी घटली आहे. त्याच तुलनेत निर्मिती खर्च वाढत असल्याने टपाल खात्याला वर्षाकाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रांना उतरती कळा!
By admin | Published: October 09, 2015 1:44 AM