लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान अनुपस्थित राहणारे ग्रामसेवक महादेव भारसाकळे, कर्तव्यात कसूर केल्याने कनिष्ठ सहायक शरद सरोदे यांना निलंबित करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांना सेवेत पदस्थापना देण्यात आली आहे. त्याचवेळी मुख्याध्यापक प्रकाश हरलाल जाधव, बाळापूर पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी एस. डब्ल्यू. मांजरे यांच्याकडून रक्कम वसुलीचाही आदेश देण्यात आला आहे.मुख्याध्यापक जाधव हे आसोला जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना खाते चौकशीत आरोप सिद्ध झाले. त्यामध्ये २ लाख १९ हजार ३२० रुपयांचा अपहार केल्याचेही स्पष्ट झाले. सोबतच राजनखेड शाळेतील मिळून एकूण ३ लाख ९१ हजार ९६० रुपये ११ टक्के व्याजासह वसूल करण्याचा आदेश देण्यात आला. ग्रामविकास अधिकारी एस. डब्ल्यू. मांजरे यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने १० टक्के रक्कम सेवानिवृत्ती वेतनातून कपात करण्याचा आदेश देण्यात आला.बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये देवदरी येथे ग्रामसेवक असलेले भारसाकळे २० सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीच्या दिवशी गैरहजर होते. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. त्यांची खातेचौकशी सुरू करून त्यांना तेल्हारा पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली. कनिष्ठ सहायक शरद सरोदे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांचीही खातेचौकशी सुरू करून अकोट पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे.निलंबित कनिष्ठ सहायक पी. के. चंदेल यांना तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात पदस्थापना देण्यात आली. निलंबित कनिष्ठ सहायक सुनील आढे यांना बाळापूर पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली. निलंबित कनिष्ठ सहायक प्रवीण मोहोड यांना बाळापूर पंचायत समितीमध्ये देण्यात आले. कनिष्ठ सहायक ए. डी. महल्ले यांना तेल्हारा पंचायत समितीमध्ये देण्यात आले. सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रातील निलंबित आरोग्य सेवक मनोहर घुगे यांना हातरुण केंद्रात पदस्थापना देण्यात आली. धोत्रा केंद्रातील निलंबित आरोग्य सेवक एस. पी. बढे यांना अडगाव केंद्रात पदस्थापना देण्यात आली.बाळापूर तालुक्यातील कळंबा बु. टाकळी खोजबोळ, कोळासा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व्ही. आर. अंधारे तपासणीच्या वेळी अनुपस्थित असणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, दप्तर अद्ययावत नसल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश देण्यात आला.हाता येथील ग्रामसेविका कांचन साहेबराव वानखडे दप्तर तपासणीच्या वेळी अनुपस्थित राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी त्यांचीही वेतनवाढ रोखण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेतील निलंबितांना पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 2:21 PM