- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात घडणारे हत्याकांड, आत्महत्या, तसेच कौटुंबिक कलहातून झालेल्या हत्या प्रकरणात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल देण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन प्रचंड दिरंगाई करीत आहे. गंभीर प्रकरणातही हे अहवाल वेळेत मिळत नसल्याने तपासात पोलिसांना खोडा निर्माण होत असून, आरोपींना सहज जामीन मिळत असल्याचे वास्तव आहे. यावरून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन वरातीमागून घोडे हाकत असल्याचे दिसून येत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासन गोंधळ कारभाराने प्रसिद्ध झाले आहे. रुग्णांवर चुकीचा उपचार करणे, त्यांच्या नातेवाइकांसोबत हुज्जत घालणे तसेच उपचार करण्यास दिरंगाई करण्याचे प्रताप अनेक वेळा घडले आहेत.येथील कारभार पुरता ढेपाळल्याने वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ तसेच रॅगिंगचे प्रकार घडले आहेत; मात्र आता पोलीस प्रशासनालाही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन झुलवत ठेवून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचे उत्तरिय तपासणीचे अहवाल देण्यास दिरंगाई करीत असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे न्यायालयात से दाखल करण्यासह तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे आणि तपास करण्यात पोलिसांना प्रचंड अडचणी येत आहेत. दोन ते तीन दिवसात पोस्टमार्टेम अहवाल येणे अपेक्षित असताना अहवाल देण्यास हेतुपुरस्सर वेळ करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पोलिसांना झुलवत ठेवणारे प्रशासन सामान्यांना देत असलेल्या त्रासाची कल्पनाही न केलेली बरी.आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्नहत्याकांड तसेच दबावातून आत्महत्या किंवा हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत. अशा प्रकरणात पोलिसांना तपास करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा उत्तरिय तपासणी अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र संबंधित आरोपींचा जामीन होईपर्यंत हा महत्त्वाचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अडवून ठेवत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. हा गंभीर प्रकार अद्यापही समोर आला नसून, यावर न्यायालयाने लक्ष घालण्याची गरज आहे.
किडनी तस्करी प्रकरणातही घातला घोळअकोल्यातील किडणी तस्करी प्रकरणात पोलीस तपास करीत असताना तांत्रिक मुद्यांची उकल करण्यासाठी काही डॉक्टरांची एक समिती तयार करण्यात आली होती. त्यावेळी या समितीने केवळ खालच्या स्तरावरील व्यक्तींनी हे रॅकेट चालविल्याचे स्पष्ट करीत हे रॅकेट चालविणारे डॉक्टर यामधून बाहेर काढण्यास पुरेपूर प्रयत्न केला होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
पोस्टमॉर्टम अहवाल देणे हे घटनेवर अवलंबून आहे. जळालेल्या व्यक्तीचा पोस्टमॉर्टम अहवाल तातडीने देता येतो. शस्त्रांनी हत्याकांड घडल्यास या हत्याकांडाचा अहवालही तातडीने देता येतो. यामध्ये अहवाल देण्यास काहीही अडचण नाही; मात्र विष प्राशन केल्यानंतर विष किडनी तसेच लिव्हरमध्ये गेल्यास त्याचा अहवाल केमिकल लॅबकडून येतो. त्यामुळे त्याला काही दिवस वेळ लागू शकतो; मात्र इतर पोस्टमॉर्टमचे अहवाल तातडीने देण्यास काहीही हरकत नाही. यासाठी संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येईल.- डॉ. शिवहरी घोरपडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.