निहिदा: पिंजर येथील वीज कंपनीचा कारभार गत वर्षभरापासून वाऱ्यावर आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये विजेचा लपंडाव वाढला असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावात समस्या वाढल्या आहेत. येथील कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती केली; मात्र नियुक्तीनंतरही कनिष्ठ अभियंता रुजू न झाल्याने परिसरातील गावांमधील समस्या जैसे थे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
पिंजर येथील वीज उपकेंद्रातर्गत अनेक समस्या वाढल्याने परिणामी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावांमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, फ्यूज जाणे आदी प्रकार वाढले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पिंजर येथे कनिष्ठ अभियंत्याची बदली झाल्यानंतर पद रिक्त आहेत. गत काही दिवसांपूर्वी येथील उपकेंद्रात कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे; मात्र ते अद्यापही रुजू झाले नाहीत. त्यामुळे गावातील समस्या ‘जैसे थे’ आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या दूर करण्याची मागणी होत आहे. ----------------
पिंजर येथे कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती केली आहे. त्यांची ऑर्डर निघाली आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसात ते रुजू होतील. ग्राहकांच्या समस्या तत्काळ दूर करण्याचा प्रयत्न आहे.
-विजयकुमार कासट, कार्यकारी अभियंता, महावितरण, अकोला.