अकोला : गत महिनाभरापासून भेडसावत असलेल्या कोळसाटंचाईमुळे महानिर्मितीच्या पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील दोनपैकी केवळ एकाच संचातून वीज निर्मिती सुरू आहे. दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा प्रकल्पात उपलब्ध असल्यामुळे गत महिनाभरापासून एक संच बंदच ठेवण्यात आला आहे.
बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट असून, याठिकाणी २५०-२५० मेगावॅट क्षमतेचे तीन व चार क्रमांकांचे संच कार्यान्वित आहेत. राज्यभरात कोळशाची अभूतपूर्व टंचाई असल्याने या प्रकल्पासाठी सध्या दररोज सरासरी एकच रेक कोळसा येत आहे. परिणामी चार क्रमांकाचा संच गत काही दिवसांपासून बंद ठेवावा लागत आहे. सुरू असलेल्या तीन क्रमांकाच्या संचातून दिवसाकाठी १७० ते २०० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.
दोन दिवसांतून मिळतोय एक रेक कोळसा
पारस प्रकल्पातील दोन्ही संचांमधून पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मितीसाठी रोज साधारणत: कोळशाच्या दोन रेकचा पुरवठा होणे गरजेचे आहे. सध्या एक दिवसाआड एक रेक येत असल्याने प्रकल्पात पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठाच नाही. त्यामुळे विद्युत निर्मितीवर परिणाम झाला आहे.
पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत नसल्याने केवळ एकाच संचातून वीज निर्मिती सुरू आहे. प्रकल्पात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. दररोज एक रेक येत असल्याने नियोजन करावे लागत आहे.
- विठ्ठल खटाडे, मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत प्रकल्प, पारस