खेट्री : गत काही महिन्यांपासून पातूर तालुक्यातील सस्ती वीज केंद्राचा ढेपाळला आहे. सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत शिरपूर, चांगेफळ शेत शिवारात काही वीजखांब वाकले असून, वीजतारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊनही महावितरणच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
शिरपूर, चांगेफळ शेतशिवारात महावितरणच्या हलगर्जीमुळे विद्युतखांब वाकले असून, वीजतारा लोंबकळल्या आहेत. लोंबकळलेल्या वीजतारांमुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी दिल्या; मात्र महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना महावितरणच्या निष्काळजी व शून्य कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. याकडे वरिष्ठांनी दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
------------------------------------------
वीजपुरवठा वारंवार खंडित
शिरपूर, चांगेफळ, खेट्री परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, शेतकरी चिंतित सापडला आहे. सध्या परिसरात कांदा, गहू पिके बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.