खेट्री : वीज बिल थकीत असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिक धास्तावले आहेत. एकीकडे, शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. दुसरीकडे, लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वीज बिल थकीत असलेल्या कृषिपंप व घरगुती कनेक्शनधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत राज्य सरकारच्या सक्तीच्या आदेशावरून महावितरण विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सस्ती वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतशिवारात लाखोंची वीजचोरी होत आहे. शासनाच्या आदेशावरून आतापर्यंत सस्ती वीज वितरण विभागाकडून ३५ ते ४० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ अभियंता पी. ए. गुहे यांनी दिली आहे.
लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांना अभय !
वीज बिल थकीत असलेल्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे; मात्र परिसरात लाखोंची वीजचोरी केल्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते, तर लाखोंची वीजचोरी करणाऱ्यांना अभय का, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार वीज बिल थकीत असलेल्या वीजजोडणीधारकांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याची कारवाई सुरू आहे. तसेच वीजचोरी करणाऱ्यांवरसुद्धा कृषी पंप, सर्व्हिस लाइन जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- पी. ए. गुहे, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती