संतोषकुमार गवई
पातूर : वीज बिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक धास्तावले आहेत. तसेच कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. महावितरणच्या या धडक मोहिमेविरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे.
महावितरणकडून थकीत वीज बिलांची वसूली करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत महावितरणकडून वीज बिल थकीत असणाऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्या जात होते. या कारवाईला विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती; मात्र ही स्थगिती उठविल्यानंतर महावितरणकडून पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पाणी देता येत नसल्याने तालुक्यातील ८०० ते ९०० एकरावरील पिके धोक्यात सापडली आहेत. दि. १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून वीज बिलांची वसुली करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकल्याने तालुक्यात महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे. सध्या पिके शेतात बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. महावितरणच्या या कारवाईच्या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे.
-----------------------------
नागरिकांमध्ये धास्ती
थकीत वीज बिलांची वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत महावितरणकडून वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या महामारीत शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच वीज बिलाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न मजुरांना पडला आहे.
-------------------------------
तालुक्यात उन्हाळी पिकांची पेरणी वाढली!
गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांची पेरणी वाढली आहे. पातूर तालुक्यात ७३३ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी भूईमुगाला पसंती दिल्याने तालुक्यात ४७३ हेक्टरवर भूईमुगाची पेरणी झाली आहे.