मूर्तिजापूर: परिसरातील चिखली गेट ते खडकादरम्यान विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंत्यांमार्फत ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून दिला आहे.
परिसरातील विद्युत पुरवठा गेल्या आठ वर्षांपासून सुरळीत नाही. त्यामुळे विद्युत ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीतर्फे नियमित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करीत चिखली येथील ग्रामस्थांनी मागील बऱ्याच वर्षांपासून निवेदने दिली आहेत. याबाबत महावितरण शाखा अभियंता विचारणा केली असता, ग्राम चिखली ते खडकादरम्यान एकच फिडर आहे व त्यामुळे एकाच फिडरवर जास्त कनेक्शन असल्याने या फिडरवर ताण येत असतो. एकाच वेळेस सगळी उपकरणे चालू असतात. त्यामुळे विद्युत ट्रिप होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे सांगण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत नागरिकांनी उपकार्यकरी अभियंत्यामार्फत राज्याचे ऊर्जामंत्री, पालकमंत्री, खासदार यांना निवेदन दिले आहे. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थ वि.वि.कंपनी मर्या. कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाला बसतील, असा इशारा निवेदनातून दिला आहे.