संतोषकुमार गवई
पातूर : तालुक्यातील आगीखेड, सोतलोन, जोग तलाव, खानापूर, खामखेड आदी भागात उन्हाळी भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढले आहे. भुईमुगाच्या पेरणीला १५ जानेवारीपासून सुरुवात होऊन गत महिनाभर पेरणी सुरूच असते. तालुक्यात पेरणी सुरू झाली आहे. गत चार दिवसांपासून थंडीत झालेली वाढ व विजेच्या लपंडावामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
यंदा शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाला पसंती देत पेरणी सुरू केली आहे. गतवर्षीसुद्धा भुईमुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. तालुक्यात १५ जानेवारीपासून पेरणीला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. भुईमुगाला रात्रीचे तापमान १८ अंशांपेक्षा कमी नको. मात्र, सद्यस्थितीत किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तापमानात घट झाल्याने बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अशातच तालुक्यात दिवसाला आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. थंडीच्या वाढत्या जोरामुळे उन्हाळी भुईमूग शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गत आठवड्यापासून थंडीचा जोर वाढल्यामुळे भुईमुगाचे बियाणे उगवणार की नाही, यामध्ये शंका आहे. तसेच वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही.
- कपील रावदेव, शेतकरी, आगीखेड
------------------------------
भंडारज परिसरात शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाला पसंती देत पेरणी सुरू केली आहे. मात्र, सद्यस्थितीत वातावरणात झालेल्या बदलामुळे भुईमुगाचे पीक संकटात सापडले आहे.
- दीपक इंगळे, शेतकरी भंडारज बु.
(फोटो)