खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा दिवसा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच कृषी पंपाचा वीजपुरवठा अनियमित असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरण लक्ष देऊन वीजपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी होत आहे.
रेशीम शेतीचे प्रमाण घटले!
तेल्हारा : गतवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केली होती. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे धोका न पत्करता केवळ गतवर्षीपेक्षा अर्ध्या शेतकऱ्यांनीच रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली. यावरून रेशीम शेतीचे प्रमाण घटत चालले आहे.
समुपदेशन केंद्र सुरू करा!
पिंजर : ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. अनेक तरुण व लहान मुले आहारी जात आहेत. त्यामुळे व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुरू करण्याची मागणी महिलांनी केली आहे. परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अवैध दारूविक्री वाढली आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत.
आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त!
वाडेगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. परंतू, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. आरोग्यसेविका यांची पदे रिक्त आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
हातरुण : परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाले.
रस्त्याच्या दुतर्फा वृक्षतोड
बार्शिटाकळी : परिसरात अवैध वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. रस्त्याच्या लगत असलेले व शेतातील वृक्ष तोडण्यात येत आहेत. त्यावर वनविभागाने नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.