-----------------
दिग्रस बु. परिसरात विजेचा लपंडाव सुरूच
दिग्रस बु.: पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहे. वीज वितरण कंपनीविरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
----------------
घूसरवाडी परिसरात निंदणाची लगबग
म्हातोडी : अकोला तालुक्यातील घुसरवाडी परिसरात निंदणाची लगबग सुरू आहे. गेले दोन दिवस परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे माळपठार शिवारात निंदणीची लगबग सुरू आहे. सद्य:स्थितीत कपाशीचे निंदणी सुरू आहे.
---------------------
तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
तेल्हारा : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची रेती वाहतुकीने दुरवस्था झाली आहे. काही गावातील संपूर्ण रस्ते दयनीय अवस्थेत आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक केली जाते. याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
---------------------------
वाडेगाव परिसरात मजुरांची टंचाई
वाडेगाव : खरीप हंगामात मजुरांची टंचाई जाणवत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने डवरणी व निंदणीला वेग आला आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. बाहेरून मजूर आणावे लागते.
----------------------
जिल्ह्यातील रुग्णसंख्ये वाढ
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आता व्हायरल फिव्हरची साथ हळूहळू पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण दाखल होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणाचे प्रयत्न होताना दिसत नाही.
-------------------
डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक झाले त्रस्त
बाळापूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. पावसाने उघडीप दिल्याने वातावरण दमट झाले आहे. या वातावरणात डासांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. फवारणी करण्याची मागणी होत आहे.
------------------------
ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंदच
पातूर : ग्रामीण भागांतील बसफेऱ्या अजूनही सुरू झालेल्या नाही. यामुळे नागरिकांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवासी एसटी बस नसल्याने अनेक अडचणी येत आहे.
------------------------------
खरप बु. परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस
अकोला : तालुक्यातील घुसर, खरप बु. परिसरात शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. अंकुरलेली कोवळी पिके वन्यप्राणी फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-------------------------
फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
बोरगाव मंजू : विविध किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणीत व्यस्त आहे. फवारणीसाठी त्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. दुसरीकडे मजुरीचे दरही वाढले आहे.
-------------------
अकोट तालुक्यातील पाणंद रस्ते दयनीय
अकोट : तालुक्यातील पाणंद रस्ते दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शेती साहित्य नेणे अवघड झाले आहे. चिखलामुळे बैलही गाळात फसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.