निहिदा : पिंजर येथील उपकेंद्रातून जवळपास ६४ खेडेगावांना वीजपुरवठा केल्या जातो. घोटा फिडरवरील पिंपळगाव चांभारे व पराभवानी येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
पिंजर येथून उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या घोटा फिडरवर वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने या फिडरवरील मोझरी खुर्द, घोटा, कानडी, विराहित, पराभवानी, आणि पिंपळगाव चांभारे येथील वीजपुरवठा वांरवार खंडित होत आहे. कधीकधी रात्रीच्या सुमारास वीज जात असल्याने नागरिकांना उकाड्यात नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना विचारणा केली तर, नागरिकांना उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कृषिपंपाचा ही वीजपुरवठा खंडित
पिंपळगाव चांभारे, पराभवानी येथील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सध्या शेतशिवारात उन्हाळी पिके व बागायती पिके असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
------------------------
पराभवानी, घोटा, पिंपळगाव वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. घोटा फीडरवरील गावांचा वीजपुरवठा सुरळीत करावा.
-भारत पाटील चांभारे, सरपंच, पिंपळगाव चांभारे.
-----------------------------------
तक्रारी करूनही समस्या ‘जैसे थे’
घोटा फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने समस्या जैसे थे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.