--------------------------------
आगर-लोणाग्रा रस्त्याची दयनीय अवस्था
आगर : परिसरातील आगर- लोणाग्रा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
(फोटो)
----------------------------------
जामठी बु. येथे लसीकरणाला प्रतिसाद
जामठी बु. : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दि.२३ एप्रिल रोजी कोविड-१९ चे लसीकरण शिबिर घेण्यात आले. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून, १०६ व्यक्तींना लसीकरण पूर्ण करण्यात आले. यासाठी डाॅ. शेगोकार, डाॅ. हरणे, जोगळेकर, खेडेकर आदींनी परिश्रम घेतले.
------------------------------
बोरगावमंजू शहरात लॉकडाऊनला प्रतिसाद
बोरगावमंजू : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनचे शहरातील नागरिकांकडून पालन करण्यात येत असून, उत्तम प्रतिसाद देण्यात येत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेनंतर अत्यावश्यक सेवांची दुकानेदेखील बंद ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------------
शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा
हाता : परिसरातील सागद, निंबा, वझेगाव, हिंगणा, निंबा, अंदुरा, कारंजा रम, मोखा, भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीक विम्याची रक्कम भरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
---------------------------------
आठवडी बाजार बंद; शेतकरी अडचणीत!
माळेगाव बाजार : येथे कोरोनामुळे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. भाव नसल्याने भाजीपाला कमी दरात विक्री करावी लागत आहे.
--------------------------------
नियम धाब्यावर; वाहनांवर कारवाई नाही!
बार्शीटाकळी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने, रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवायच धावत आहेत.