महाडीबीटी पोर्टलद्वारेच योजनांचा लाभ
अकाेला : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ आता एकच अर्जाने देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते थेट लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीयप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारेच शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे
कचरा व्यवस्थापन करा
अकाेला : हद्दवाढीमध्ये समाविष्ट झालेल्या प्रभागांमध्ये अजूनही कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकत आहेत. या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
नाल्यांमध्ये प्लॅस्टिक
अकाेला : शहरात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात. अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या प्लॅस्टिक पिशव्या व कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकून देतात. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत.
उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका
अकाेला : राष्ट्रीय महामार्ग तथा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला वाहने उभी केली जातात. पंचायत समितीच्या परिसरात तर वाहन तळच निर्माण झाला आहे, अशा बेबंद पार्किंगमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शहरात माल घेऊन येणारी वाहने नेहमीच अशी उभी केली जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे
फेरीवाल्यांचे रस्त्यावर अतिक्रमण
अकाेला : शहरातील गाेरक्षण मार्गावर फेरीवाल्याची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असून, संध्याकाळी रस्त्याच्या कडेला बाजार भरल्याचे दिसत आहे . परिणामी, दररोज वाहतुकीची कोंडी होताना दिसते. वाहतूक पोलिसांनी फेरीवाल्यांवर कारवाई करीत रस्ते वाहतुकीकरिता मोकळे करण्याची मागणी होत आहे.