लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : गत महिनाभरापासून शेतशिवारातील वीजखांब पडून असल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात सापडली आहेत. शिर्ला शिवारात ४०० लिंबू झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.
शिर्ला शिवारात महिनाभरापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. वादळी वाऱ्यामुळे शेतकरी विश्वंभर अंधारे यांच्या शेतात असलेला वीजखांब कोसळला होता. त्यामुळे या खांबावरील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या महिनाभरापासून वीजखांब तसाच पडून असल्याने विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात सापडली आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात जात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली; मात्र महावितरणच्या मनमानी कारभारामुळे परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. सध्या शेतशिवारात लिंबूचे पीक बहरले आहे. लिंबू पिकाला बाजारपेठेत मागणी आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने लिंबूचे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजखांबाची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-----------------------------
लिंबू पिकाला सर्वाधिक फटका
शिर्ला शिवारात सद्यस्थितीत भाजीपालावर्गीय पिकांची पेरणी केली आहे. त्याचबरोबर लिंबूचे पीक बहरले आहे. लिंबू पिकाला पाण्याची आवश्यकता असतानाच विजेअभावी पाणी देता येत नसल्याने लिंबूचे पीक धोक्यात सापडले आहे. येथील विश्वंभर अंधारे यांची १०० लिंबूची झाडे, महादेव वसतकार यांची १५० लिंबूची झाडे आणि अंबादास मैसने यांची १०० लिंबूची झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
----------------
गतवर्षी खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सद्यस्थितीत लिंबू पिकावर मदार आहे; मात्र महावितरणच्या दुर्लक्षतेमुळे लिंबूचे पीकही धोक्यात सापडले आहे. शिर्ला शेतशिवारातील वीजखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत करावा.
- विश्वंभर अंधारे, शेतकरी, शिर्ला.