खेट्री: पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्र नेहमी कुलूपबंद असते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ कार्यालय उघडण्याच्या प्रतीक्षेत सकाळपासून ते सायंकाळपर्यंत उपकेंद्राबाहेर ताटकळत बसतात. तरीही कार्यालय उघडत नसल्याने ग्राहक कामाविनाच घरी परत जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.
सस्ती येथे वीज उपकेंद्र असून, परिसरातील काही ग्राहक विविध कामांसाठी वीज उपकेंद्र कार्यालयावर येतात. शुक्रवारीही ग्रामस्थ कामानिमित्त उपकेंद्रात आले असता कार्यालयास कुलूप असल्याने ते कार्यालय उघडण्याच्या प्रतीक्षेत सायंकाळपर्यंत ताटकळत बसून कामाविना परत घरी गेले. संबंधित वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ वैतागले आहे. सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत एकूण २७ गाव असून, नवीन विद्युत कनेक्शन, अव्वाच्या सव्वा बिल व इतर कामासाठी परिसरातील ग्राहक सस्ती उपकेंद्रात येतात. उपकेंद्राला नेहमी कुलूप असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या उपकेंद्रांमध्ये एकही कर्मचारी हजर नसतो. नेहमी कार्यालयाला कुलूप असल्याने ग्राहकांचे विविध कामे रखडली आहे. तत्कालीन कनिष्ठ अभियंता डी.के. कंकाळ यांची बदली झाल्याने उपकेंद्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बंद होता. याबाबत ग्रामस्थांनी ७ ऑगस्ट २०२० रोजी उपकेंद्रासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करताच संबंधितांनी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी या उपकेंद्राला नवीन कनिष्ठ अभियंता पी.ए. गुहे यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु ते रुजू झाल्यापासून आठवड्यात एक ते दोन दिवस कार्यालय उघडल्या जाते, उर्वरित दिवशी कार्यालय बंद असते, संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
-------------------------
जे कर्मचारी उपकेंद्रातात असतात, तो कर्मचारी रजेवर गेल्याने दोन दिवसांपासून उपकेंद्र बंद होते. तरीही यापूर्वी काळजी घेण्यात येईल.
-पी.ए. गुहे, कनिष्ठ अभियंता वीज उपकेंद्र, सस्ती.