अकोला : आश्वासन दिल्यानंतरही ३१ मार्च रोजी १.६४ कोटीच्या थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने खांबोरा आणि ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा एकदा खंडित केला.
वीजबिल वसूलीसाठी महावितरण प्रत्येक थकबाकीदार ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचत असताना, खांबोरा आणि ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेकडे अनुक्रमे १.०८ आणि ५६ लाखाचे वीजबिल थकित आहे. संबंधित विभागाकडून वीजबिल भरण्यास प्रतिसादच मिळत नसल्याने दिनांक१६ मार्च रोजी खांबोरा आणि १८ मार्च रोजी ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकित बिलासाठी खंडित करण्यात आला होता. कृत्रिम जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून महावितरणने संबंधित विभागाच्या वीजबिल भरण्याच्या आश्वासनावर खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत केला होता. या कालावधित जिल्हा प्रशासनाने वीजबिल भरण्याची तसदी न घेतल्याने १.०८ कोटीसाठी खांबोरा पाणी पुरवठा योजनेचा तर ५६ लाखासाठी ८४ खेडी अकोट पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणला नाईलाजस्तव पुन्हा खंडित करावा लागला आहे.
अकोला व बार्शीटाकळीतील पथदिव्यांवर टांगती तलवार
अकोला महानगर पालिकेकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी १ कोटी ८० लाख रूपये थकित आहे.बार्शीटाकळी नगरपंचायतीकडे पथदिव्याचे थकित असलेल्या १ कोटी रूपयापैकी फक्त ६ लाख रूपयेच आतापर्यंत भरल्या गेले आहे. त्यामुळे दोन्हीही विभागांशी पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात अकोला महानगर पालिकेकडून तसेच बार्शीटाकळी नगरपंचायतीकडून वीजबिलाचा भरणा करण्यात आला नाही तर अकोला शहर आणि बार्शीटाकळी शहर हे अंधारात जाणार आहे.