खेट्री : पातुर तालुक्यातील खेट्री येथे गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यास संपर्क केला; परंतु महावितरण विभागाकडून दखल घेतली गेली. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी २४ जुलै रोजीच्या अंकात बातमी प्रकाशित करताच संबंधित महावितरण विभागाला जाग आली. वृत्त प्रकाशित केल्याच्या दिवशीच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. सस्ती वीज उपकेंद्राचा गेल्या काही महिन्यांपासून गलथान कारभार सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच खेट्री येथील रोहित्र जळाल्याने चार दिवसांपासून गाव अंधारात होते. गावातील पीठ गिरण्या बंद असल्याने ग्रामस्थांना शेजारच्या गावातून दळण आणावे लागत होते. खेट्री येथे सिंगल फेजची दोन रोहित्रे आहेत, परंतु दोन्ही रोहित्रांमध्ये नेहमी बिघाड होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. अखेर याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवार रोजीच्या अंकात प्रकाशित करताच महावितरण विभाग खडबडून जागा झाला आणि शनिवार रोजी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
240721\4159img20210724114211.jpg
फोटो