अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळातील कृषी पंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषी पंपधारक चालू देयक भरणार नाहीत, अशा कृषी पंप वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई गुरुवार, २६ आॅक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहे. या वसुली मोहिमेत अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता,अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्याचे अधीक्षक अभियंते तसेच सर्व विभागीय कार्यकारी अभियंते सहभागी होणार आहेत . कृषी पंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीज क्षेत्रामध्ये उधारीचे दिवस संपुष्टात आले असल्याने वीज देयकांची वसुली होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीनेच आता कृषी पंप ग्राहकांच्या वीज बिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, एप्रिल २०१७ आणि जुलै २०१७ असे आकारण्यात आलेले चालु देयके अर्थात दोन त्रैमासिक देयकं कृषी पंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. अकोला परिमंडळांतर्गत असलेल्या अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये कृषी पंपधारकांची वीज देयकं वसुली मोहीम कठोरपणे राबवली जाणार आहे.
अकोला परिमंडळात कृषी पंपधारकांकडे १४१८ कोटींची थकबाकी
परिमंडळामध्ये एकूण २ लाख ६२ हजार ५६५ कृषीपंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर १ हजार ४१८ कोटी १ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५६ हजार ६९१ ग्राहकांकडे २७९ कोटी ६४ लाख ६४ हजार रुपयांची , वाशिम जिल्ह्यातील ५३ हजार ७७९ ग्राहकांकडे ३१९ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपयांची तर बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ९५ ग्राहकांकडे ८१८ कोटी ५९ लाख ४२ हजार रुपयांची थकबाकी आहे.
कृषी पंपधारकांनी सहकार्य करावे - अरविंद भादीकर थकबाकीदार कृषी पंपधारकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याकरिता चालू वर्षातील दोन त्रैमासिक वीज बिलाची रक्कम त्वति भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले आहे.