व्यापारी आघाडी संयाेजकपदी रांदड
अकाेला : भाजपच्या महानगर व्यापारी आघाडी संयोजक पदावर व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते सुधीर रांदड यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी आ. रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, शंकरराव वाकोडे, तेजराव थोरात, माधव मानकर, जयंत मसने, श्रावण इंगळे, विशाल इंगळे, आदी उपस्थित होते.
तेजराव थाेरात वाशिमचे प्रभारी
अकाेला : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तेजराव थोरात यांच्याकडे वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल व भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
शुक्रवारी भाजपचा मेळावा
अकोला : भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे ८ जानेवारीला आयाेजन करण्यात आले आहे. स्थानिक मराठा मंगल कार्यालय रामदास पेठ येथे दुपारी चार वाजता मेळावा पार पडेल. यावेळी पक्षाचे मंडळ पदाधिकारी, प्रमुख शक्ती केंद्र, बुथ प्रमुख, सक्रिय सदस्य उपस्थित राहतील.
वाकापूर रस्त्याची दुरवस्था
अकाेला : प्रभाग क्रमांक १ मधील नायगाव ते वाकापूर रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. वाकापूर परिसरातील रहिवाशांना शहरात दाखल हाेण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचणीला सामाेरे जावे लागत आहे. अवघा सहा ते आठ फुट रुंद रस्त्यालगत पथदिव्यांची सुविधा नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
जलवाहिनीचे काम वेगात
अकाेला : प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या हद्दवाढ क्षेत्रातील डाबकी येथे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशातून मनपा प्रशासनाच्यावतीने मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहिनीला रेल्वे रुळाचा अडसर दूर झाला असून, मनपाने रेल्वे प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे.
गाेकर्णा पार्कमध्ये नाल्या तुंबल्या
अकाेला : मनपाच्या बांधकाम विभागाने डाबकी राेड परिसरातील गाेकर्णा पार्क येथे नाल्यांची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे या भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सांडपाणी साचल्यामुळे त्यातून वाट काढताना रहिवाशांच्या नाकीनऊ आले आहे. ही समस्या नगरसेवकांसह मनपाने निकाली काढण्याची मागणी हाेत आहे.
रेल्वे क्वाॅर्टरमध्ये सुविधांचा अभाव
अकाेला : अकाेटफैल भागातील रेल्वे क्वाॅर्टरमध्ये मागील काही दिवसांपासून मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपाचे साफसफाई कर्मचारी, तसेच नगरसेवक फिरकत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.