लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीमध्ये नायगाव येथील ‘डम्पिंग ग्राउंड’वर कोरोनाबाधित रुग्णांना हाताळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पीपीई किट’ उघड्यावर फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, मनपासह जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन वादाच्या भोवºयात सापडले आहे.महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांनी ३०० चा आकडा पार केला आहे. गत काही दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. आज रोजी शहराच्या प्रत्येक कानाकोपºयात तसेच हद्दवाढ क्षेत्रामध्येही कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याचे समोर येत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातील कचरा साठवणूक केल्या जाणाºया नायगाव येथील ‘डम्पिंग ग्राउंड’ येथे कोरोनाबाधित रुग्णांना हाताळण्यासाठी वापरल्या जाणाºया ‘पीपीई किट’ उघड्यावर फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असताना ‘पीपीई किट’ची बायोमेडिकल वेस्टच्या निकषानुसार विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे असताना या किट उघड्यावर टाकून देण्यात आल्याने नायगाव परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची दखल घेत प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच ‘डम्पिंग ग्राउंड’वर टाकण्यात आलेल्या ‘पीपीई किट’ची तातडीने विल्हेवाट लावण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली.किट आल्या कोठून? प्रश्न अनुत्तरितप्रभाग क्रमांक दोनमधील काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधला असता या किट आमच्या नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने हात झटकले. त्यानंतर मनपा प्रशासनानेसुद्धा याप्रकरणी नामनिराळे होणे पसंत केले. त्यामुळे जीवघेण्या कोरोनाच्या साथीमध्ये या किट आल्या कुठून, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
नायगाव येथील ‘डम्पिंग ग्राउंड’वर टाकण्यात आलेल्या ‘पीपीई किट’ प्रकरणी नागरिकांमध्ये संताप आहे. याप्रकरणी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.- पराग कांबळे, नगरसेवक,प्रभाग क्रमांक -२