अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत हवामानातील प्रतिकूल परिस्थितीकरिता खालीलप्रमाणे पीक नुकसान सर्वेक्षणाकरिता संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळविले असून, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात अनेक शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढतात. या योजनेंतर्गत येणाऱ्या विमा संरक्षणाच्या बाबींमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे झालेले नुकसान, गारपिट, भूस्खलन व काढणी पश्चात नुकसान (चक्रीवादळ, अवकाळी पाऊस) यामुळे नुकसान झाल्यास होणारे नुकसान निश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून आता संयुक्ती समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशी आहे समिती
समितीमध्ये अध्यक्ष-संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी, सदस्य सचिव-मंडळ कृषी अधिकारी सदस्य-कृषि विस्तार अधिकारी/कृषि अधिकारी (पंचायत समिती), विमा प्रतिनिधी,शेतकरी प्रतिनिधी असे राहणार आहे. या समितीने मार्गदर्शक सुचनेनुसार सर्वेक्षण करून त्वरीत अहवाल सादर करावा,असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
९८ हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान
गत जून, जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यात कधी संततधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी झाली. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतजमीनही खरडून गेली. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ९८ हजार ३२१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.