अकोला : शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शासन स्तरावरील मुद्यांवर विधान भवनात बैठक घेण्याचे आश्वासन कृषी मंत्री यांनी दिले, तसेच जिल्हा स्तरावरील मुद्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी आमदार बच्चू कडू यांना दिले. जिल्हाधिकारी व कृषी मंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याने ‘प्रहार’चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शुक्रवारी रात्रीचा मुक्काम टळला.गतवर्षी तूर विकलेल्या शेतकºयांना भावांतर योजनेंतर्गत प्रतिक्विंटल एक हजार रुपये तफावतीची रक्कम शेतकºयांना अद्याप मिळाली नाही. हरभरा, सोयाबीनचे प्रलंबित अनुदान, तूर खरेदीतील घोळ, जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावांमध्ये सुविधांचा अभाव, विजेचे भारनियमन व नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान यासह इतर प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अकोल्यातील स्वराज्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मुक्काम मोर्चा गांधी रोड, पंचायत समिती समोरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. आ. बच्चू कडू यांच्यासह एका शिष्टमंडळाने शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रश्नांवर १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आ. बच्चू कडून यांना दिले. त्यानंतर शासन स्तरावरील प्रश्नांच्या मुद्यावर विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विधान भवनातील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयात संबंधितांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. बच्चू कडू यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना दिले. यासंदर्भात कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अतुल खानोलकर यांच्यामार्फत कृषी मंत्र्यांचे लेखी आश्वासनही आ. बच्चू कडू यांना मिळाले. त्यामुळे विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी रात्री होणारा मुक्काम मागे घेण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर, प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कुबडे, मंगेश देशमुख, प्रवीण हेंडवे,युवक आघाडी जिल्हाध्यक्षयोगेश पाटील, नीलेश ठोकळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ‘प्रहार’च्या मुक्काम मोर्चात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.